रत्नागिरी - दापोली तालुक्यातील मुरुड गावातील गट नंबर 410मधील बांधकाम मिलिंद नार्वेकर यांनी स्वतःच निष्कासित केले असल्यामुळे सध्या या जागेवर कोणतेही बांधकाम अस्तित्वात नाही, अशी माहिती रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी भाजपा नेते किरीट सोमैया यांना दिली आहे. हे बांधकाम पाडले जावे, यासाठी सोमैया यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.
प्रकरण काय?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांचे दापोली तालुक्यातील मुरुड गावातील अनधिकृत बंगला प्रकरण गेले काही दिवस गाजत होते. नार्वेकर यांनी मुरुड येथे जागा विकत घेऊन या जागेत असलेले पूर्वीचे घर पाडून तेथे नवीन बंगला बांधण्याचे काम सुरू केले होते. मात्र भाजपाचे नेते व माजी खासदार किरीट सोमैया यांनी हे बांधकाम हे अनधिकृत असून ते सीआरझेडमध्ये येत असल्याची तक्रार केली होती. सोमैया यांनी याबाबत स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी तसेच केंद्राकडेही तक्रार केली होती.
आंदोलनाचा इशारा
या बंगल्याची पाहणी केंद्रीय पर्यावरण विभागाचे अधिकारीही येऊन करून गेले होते. हे अनधिकृत बांधकाम तोडले नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा सोमैया यांनी प्रशासनाला दिला होता. त्यानंतर हे अनधिकृत बांधकाम मिलिंद नार्वेकर यांनी ऑगस्ट स्वतःच पाडून टाकले.
जिल्हाधिकाऱ्यांची सोमैया यांना माहिती
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सोमैया यांना माहिती दिली आहे, की मुरुड (ता. दापोली) येथील गट नं. 410मधील बांधकाम मिलिंद केशव नार्वेकर यांनी स्वतःच निष्कासित केलेले असल्यामुळे सद्यस्थितीमध्ये कोणतेही बांधकाम जागेवर अस्तित्वात नाही. सबब बांधकाम पूर्णतः निष्कासित झाले आहे, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी सोमैया यांना दिले आहे.