रत्नागिरी - गेल्या अनेक दिवसापासून राजकीय वर्तुळात भाजप-शिवसेनेच्या युतीची चर्चा आहे. सध्या जागा वाटपावरून युतीत घमासान सुरू आहे. दरम्यान युतीची घोषणा 19 सप्टेंबरला होण्याची शक्यता असल्याचे विधान भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप 19 सप्टेंबरला नाशिकमध्ये होणार आहे. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत शिवसेना-भाजप युतीची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.
दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरच्या जागेवर भाजपचा ठामपणे दावा आहे. तसेच रत्नागिरी व राजापूर या दोन जागांचीही मागणी भाजपने केली आहे. यातील किमान 2 जागा नक्की मिळाव्यात, अशी मागणी असल्याचे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. युतीच्या नियमानुसार विजयी उमेदवार असल्यास किंवा दुसर्या क्रमांकाची मते युतीच्या उमेदवारास असल्यास ती जागा त्या पक्षाला सोडण्यात येते.
गुहागरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून भास्कर जाधव विजयी झाले व आता ते शिवसेनेत आहेत. गेल्या निवडणुकीत दुसर्या क्रमांकाची मते भाजपच्या डॉ. विनय नातू यांना मिळाली असल्याने या जागेवर आम्ही ठामपणे दावा केला असल्याचे लाड म्हणाले. दरम्यान कणकवली विधानसभेची जागा भाजपच्या चिन्हांवर लढवली जाईल, असाही विश्वास लाड यांनी व्यक्त केला.