रत्नागिरी - शेतकरी कायद्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भूमिका आश्चर्यकारक असल्याचे मत भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केले आहे. त्या आज रत्नागिरी भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
'ते' कायदे केंद्राने केल्यावर नुकसानीचे कसे काय ठरू
स्वामीनाथन आयोग रिकमंड करणारे शरद पवार साहेबच आहेत. शेतकऱ्यांना संरक्षण देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. जे कायदे आता केंद्राने केले आहेत, ते यापूर्वीच महाराष्ट्रात होते. ते पवार साहेबांच्याच नेतृत्वाखाली इतके वर्ष चालू होते. त्यामुळे राज्यामध्ये जे हितावह कायदे आहेत, ते केंद्राने केल्यावर नुकसानीचे कसे काय ठरू शकतात, असा सवाल वाघ यांनी उपस्थित केला आहे.
'शेतकरी विधेयक विरोधकांनी नीट वाचले पाहिजे'
शेतकऱ्यांना फायदा होईल, असेच हे विधेयक आहे. शेतकरी विधेयकाला ज्यांचा विरोध आहे किंवा जे विरोध करताहेत त्यांनी हे विधेयक नीट वाचले पाहिजे, असा टोलाही वाघ यांनी यावेळी लगावला. तसेच महाराष्ट्रात तर हे कायदे सुरुवातीपासून लागू आहेत. तसेच्या तसे मुद्दे केंद्र सरकारने घेतले आहेत, आणि तिकडे कायदा केला, तर मात्र त्याला विरोध होतो. अशा पद्धतीची काही पक्षांची दुटप्पी भूमिका आहे. आज फक्त विरोधाला विरोध होतोय की काय, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. हे कायदे शेतकऱ्यांसाठी आहेत, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहेत, त्यामुळे आज ना उद्या शेतकरी कायद्याविरोधातली ही कोंडी फोडण्यास सरकार नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास चित्रा वाघ यांनी यावेळी व्यक्त केला आहे.