रत्नागिरी - फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत रत्नागिरी येथील भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर बीच गेम्स महोत्सवाची मंगळवारी सूरुवात झाली. या निमित्त मुलांसोबतच सर्व अधिकारी आपले वय विसरून बालपणीच्या खेळात रंगल्याचे दृश्य या ठिकाणी सहभागी खेळाडूंना पहायला मिळाले.
क्रीडा व युवक संचालनालय पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्यावतीने आणि नगरपरिषद रत्नागिरी व भाट्ये ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने या ४ दिवसीय बीच महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास उपविभागीय अधिकारी विकास सुर्यवंशी, तहसीलदार शशिकांत जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष झुंझारे, सहायक नियोजन अधिकारी मनोज पवार, शिक्षणाधिकारी निशा वाघमोडे, नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, भाट्ये ग्रामपंचायतीचे सरपंच पराग भाटकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी, क्रीडाधिकारी किरण बोरवडेकर यांनी प्रारंभी प्रास्ताविकात कार्यक्रमाची भूमिका विशद करत सर्वांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तर, उद्घाटनपर भाषणात सुभाष झुंजारे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा - रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत मनसे शक्तीनिशी मैदानात
४ दिवस चालणाऱ्या या बीच महोत्सवात बीच व्हॉलीबॉल, बीच कबड्डी, बीच खो-खो, बीच थ्रोबॉल, मैदानी स्पर्धा तसेच पारंपरिक खेळ जसे लंगडी, लगोरी, डॉजबॉल, तीन पायांची शर्यत, विटी दांडू, रस्सीखेच आदी स्पर्धा होणार आहेत. या महोत्सावाच्या पहिल्या व्हॉलीबॉलच्या सामन्याचा हवेत तिरंगी फुगे सोडून, नारळ फोडून प्रारंभ करण्यात आला. यावेळी अधिकारीही खेळात रमले होते. अधिकारी संघांमध्ये रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महसूल व नगरपालिका अधिकारी यांचा संघ यात विजयी ठरला.
त्यानंतर मावळतीच्या साक्षी विटी दांडू, गोट्या, टायर फिरविण्याची स्पर्धा तसेच दोरीवरच्या उड्या आदी बालपणीची आठवण देणारे खेळ या अधिकाऱ्यांसाठी ठेवण्यात आले होते. यात साऱ्या अधिकाऱ्यांनी हिरीरीने सहभाग घेतला. यानिमित्ताने साऱ्यांनी आपण स्वत:ही पूर्णपणे फिट आहोत की नाही, याची एक प्रकारे चाचपणी केली. सूर्यास्तापर्यंत या ठिकाणी खोखो आणि व्हॉलीबॉलचे सामने सुरू होते.
हेही वाचा - आरे वारे येथे बर्निंग कारचा थरार, सुदैवाने जीवितहानी टळली