मुंबई - बुधवारी सकाळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू झाल्यानंतर मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या अनेक सेलेब्रिटींनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर अनेकांनी मतदारांना आवाहन करुन लोकशाहीच्या या उत्सवात सामील होण्याची विनंती केली.
अभिनेता कार्तिक आर्यन एका मतदान केंद्रावर दिसला. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यानं नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित केले. तो म्हणाला, "मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे, त्यामुळे प्रत्येकाने जाऊन मतदान केले पाहिजे."
अभिनेता आणि शिवसेना नेते गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा म्हणाली, "सर्व लोकांनी बाहेर पडून मतदान करावे अशी माझी इच्छा आहे... जो कोणी (सत्तेवर) येईल त्यानं चांगलं काम करावे आणि लोकांची सेवा करावी."
अनुपम खेर, निकिता दत्ता, रीना दत्ता (अभिनेता आमिर खानची माजी पत्नी), शुभा खोटे आणि शर्वरी वाघ यांच्यासह इतर सेलिब्रिटींनीही लोकशाही प्रक्रियेत भाग घेतला.
बॉलीवूड अभिनेता सोनू सूद, अक्षय कुमार, राजकुमार राव, रितेश देशमुख, जेनेलिया, फरहान अख्तर आणि अली फझल अशा अनेक प्रसिद्ध कलाकारांनीही आज दिवसाच्या सुरुवातीस मतदान केले.
मुंबईत एका मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर अभिनेता अनुपम खेर म्हणाले, "सर्व काही अतिशय व्यवस्थित आहे... अधिकारी सर्वांशी खूप छान वागत आहेत... स्वतंत्र देशात निवडणुकीपेक्षा मोठा उत्सव नाही. सामान्य माणूस त्यात असतो. मतदान करण्यापूर्वी त्याच्या रोजच्या गरजा लक्षात घ्या...जर आज कोणी मतदान केले नाही, तर त्यांना पुढील पाच वर्षात तक्रारी करण्याचा अधिकार आहे... " असंही तो पुढे म्हणाला.
चित्रपट दिग्दर्शक अशोक पंडित यांनी एएनआयशी बोलताना मताच्या महत्त्वावर आपले विचार मांडले. "मला वाटते की मतदान करणे आवश्यक आहे ही एक सक्ती बनली पाहिजे. तरच आपल्या या देशात परिस्थिती बदलेल. नाहीतर, एका मताने काही फरक पडत नाही, असे सांगून लोक ते फार हलके घेतील. पण त्या एका मताला खूप महत्त्व आहे. "