रत्नागिरी - पर्यटन व्हिसा घेऊन रत्नागिरीत आलेले काही बांगलादेशी लोक आक्षेपार्ह गोष्टी करत आहेत, त्यामुळे त्यांना प्रतिबंध करावी, अशी मागणी भाजपने निवेदनाद्वारे केली आहे. सीएए व एनआरसी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामध्ये त्यांच्या सहभागाची चौकशी होणे गरजेचे असून पोलिसांनी सखोल चौकशी करून प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे, रत्नागिरीतील राजीवडा परिसरात बांगलादेशी नागरिक टुरिस्ट व्हिसा घेऊन वास्तव्यास आले आहेत. हे पर्यटक नागरिक पर्यटन न करता जमात-ए-तबलीगच्या प्रसारासाठी काम करणारे आहेत. पर्यटन व्हीसा काढून आलेल्या विदेशी नागरिकाला पर्यटनाव्यतिरीक्त कोणतेही काम करणे, तसेच एकाच ठिकाणी जास्त दिवस वास्तव्य करणे याला मज्जाव आहे. पण, ते नागरिक या निमयांची पायमल्ली करत धार्मिक प्रसार करत आहेत. त्याचबरोबर सरकारविरोधात गैरसमज पसरवत असल्याची शंकाही या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. शहरात त्यांचे वास्तव्य व हालचालली या संवेदनशील आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. एकूण तेरा बांगलादेशी नागरिक असून आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.
हेही वाचा - सोलापूर-तुळजापूर महामार्गावर गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकला आग; आगीत सिलेंडरचे स्फोट