रत्नागिरी - गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांनी रविवारपासून परतीची वाट धरली आहे. मात्र, गाड्यांना तुफान गर्दी त्यात पावसाची संततधार त्यामुळे परतीच्या प्रवासात चाकरमान्यांचे हाल होत असलेले पाहायला मिळत आहेत. परतीच्या प्रवासावेळी मुंबईकडे जाणाऱ्या कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्या चाकरमान्यांनी खचाखच भरलेल्या पाहायला मिळत आहेत.
रत्नागिरी, चिपळूण, खेडच्या स्थानकात सध्या पाय ठेवायला जागा मिळत नाही. जिथे जाल तिथे मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी ट्रेनच्या प्रतीक्षेत असलेले चाकरमानी पाहायला मिळत आहेत. कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या खचाखच भरल्याने रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाडीत चढताना चाकरमान्यांना कमालीची कसरत कराली लागत आहे. अनेक लोक रेल्वेच्या दारात उभं राहून प्रवास करत आहेत. रेल्वेच्या दरवाज्यातून डब्यात सरकायला बोट शिरेल एवढीसुद्धा जागा नाही. सर्वच गाड्या तुफान गर्दीने भरून जात असल्याने चेंगराचेंगरी व वादावादीच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे.
रत्नागिरी रेल्वे स्टेशनप्रमाणे जिल्ह्यातील इतर रेल्वे स्टेशनवर सुद्धा गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान चाकरमन्यांना मोठीच कसरत करावी लागत आहे. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने सर्वच स्थानकांवर रेल्वे सुरक्षा बल तैनात केलं आहे.