रत्नागिरी - राज्यातील इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, तसेच सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करावी, या मागण्यांसाठी दापोलीमध्ये कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून आंदोलन सुरू केले आहे. कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाच्या माध्यमातून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सोमवारपासून सुरू केले.
कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, ही गेल्या अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मात्र, त्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप संघटनेने केला. अश्वासित प्रगती योजनेसहित सातवा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून सोमवारपासून हे आंदोलन सुरू केले. तर, कृषी विद्यापीठाच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
हेही वाचा - 'कांदा उत्पादकांना उद्ध्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा डाव'
तसेच 1 नोव्हेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास लेखणी बंद, काम बंद, लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे, असा इशाराही यावेळी देण्यात आला.