रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात दुपारनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील किनारपट्टी भागात आज दुपारनंतर पावसाची जोरदार हजेरी पहायला मिळाली.
हेही वाचा - अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात एनडीआरएफच्या 4 टीम दाखल
दुपारनंतर पावसाचा जोर वाढला
आज सकाळपासून पावसाने दडी मारली होती. मात्र, दुपारनंतर मुसळधार पावसाच्या सरी पहायला मिळाल्या. किनारपट्टी भागातील खाडी पट्ट्यातसुद्धा मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या दोन तासांहून अधिक काळ इथे पाऊस होत आहे. आजपासून पुढील पाच दिवस रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट हवामान खात्याने जारी केला होता. मात्र आज सकाळपासून पाऊस गायब होता, मात्र दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी पहायला मिळाल्या.
रत्नागिरी जिल्ह्यात 24 तासांत एकूण 453.80 मि.मी पावसाची नोंद झालेली आहे. जिल्ह्यात शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासांत पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 64.80 मि.मी, दापोली 26.50 मि.मी, खेड 45.10, गुहागर 47.30 मि.मी, चिपळूण 59.20 मि.मी, संगमेश्वर 42.00 मि.मी, रत्नागिरी 55.20 मि.मी, राजापूर 58.40 मि.मी, लांजा 55.30 मि.मी. आहे. रत्नागिरी तालुक्यात मौजे पानवल येथे एका घराचे नुकसान झाले. स्वप्निल अनंत कांबळे यांच्या घराचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून अंशत नुकसान झाले आहे, कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
जिल्ह्यात रेड अलर्ट
हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात पावसाचा ‘आरेंज अलर्ट' जाहीर केलेला होता. मात्र, कोकण किनारपट्टीवरील वातावरण बदलामुळे शुक्रवारी सायंकाळी रत्नागिरी जिल्ह्यात ‘रेड अलर्ट' जाहीर केला. तर, पावसामुळे आपत्ती उद्भवल्यास निवारणासाठी यंत्रणेलाही अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले. आज हा अलर्ट असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
हेही वाचा - सात दिवसांच्या टाळेबंदीनंतर आज जिल्हा 'अनलॉक', बाजारात गर्दी