रत्नागिरी - जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या सोळाशे पार गेली आहे. सोमवारी (दि. 27 जुलै) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 62 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 618 झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. अलीकडच्या काही दिवसांत तर ही संख्या झपाट्याने वाढली आहे. आज (दि. 27 जुलै) आलेल्या अहवालापैकी रत्नागिरीत तब्बल 25 रुग्ण नव्याने सापडले आहेत. तसेच दापोली येथे 11, कामथेमध्ये 8, गुहागरयेथे 8, राजापूर (रायपाटण) 3, खेड (कळंबणी) 7 जणांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 618 इतकी झाली आहे. मात्र, दिवसेंदिवस वाढत असणारी कोरोना बाधितांची संख्या जिल्ह्याच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 52 वर पोहोचली आहे.
148 प्रतिबंधित क्षेत्र
जिल्ह्यात सध्या 148 प्रतिबंधित क्षेत्र असून रत्नागिरी तालुक्यात 26 गावांमध्ये, दापोली मध्ये 2 गावांमध्ये, खेड मध्ये 35 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 6, चिपळूण तालुक्यात 65 गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात 3 , गुहागर तालुक्यात 8 आणि राजापूर तालुक्यात 3 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.