रत्नागिरी - कोरोनावर मात केलेल्या सहा महिन्याच्या बाळाला आज जिल्हा शासकीय रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी डाॅक्टर आणि नर्सनी टाळ्या वाजवून बाळाचे अभिनंदन केले, तर गेले काही दिवस या बाळावर उपचार करणाऱ्या डाॅक्टर आणि नर्सनं बाळाला नवीन कपडे घेतले.
साखरतरमधील एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये पहिल्यांदा एक महिला कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आली होती. त्यानंतर तिच्या जाऊला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर धक्कादायक म्हणजे या घरातील सहा महिन्याचे बाळ सुद्धा कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले होते. या बाळाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, या बाळानेही कोरोनावर मात केली आहे. आज या सहा महिन्याच्या बाळाला डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज देताना डाॅक्टर आणि नर्सनी टाळ्या वाजवून बाळाचे अभिनंदन केले, तर गेले काही दिवस या बाळावर उपचार करणाऱ्या डाॅक्टर आणि नर्सनं बाळाला नवीन कपडे घेतले.
रत्नागिरीमध्ये सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही -
बाळासोबत त्याच्याच घरातील इतर दोन महिला देखील कोरोनामुक्त झाल्या होत्या. त्यांना देखील या बाळासोबत आज डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात एकूण 6 रुग्ण कोरोनाबाधित होते. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता, तर गुहागर तालुक्यातील एका रुग्णाला काही दिवसांपूर्वी डिस्चार्ज देण्यात आला होता. राजीवडा येथील रुग्णालाही दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर आज बाळासह उर्वरित 2 महिलांनाही डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आता जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नाही.