रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. शनिवारी एकाच दिवशी तब्बल १७ जणांचा उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर गेल्या काही दिवसात सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे शनिवारी तब्बल २३ जणांच्या मृत्यूची घोषणा जिल्हा रुग्णालयाने केली आहे. तर ५६३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १८ हजार ६०९ झाली आहे.
दिवसभरात १७ जणांचा मृत्यू
जिल्ह्यात सध्या दिवसेंदिवस कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागासामोर रुग्णांचे प्राण वाचविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. शनिवारी दिवसभरात १७ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये राजापूरमधील ३, संगमेश्वरमधील २, खेडमधील ४, रत्नागिरीतील ६, लांजा १, तर चिपळूणमधील १ मृत रुग्णांचा समावेश आहे. सर्व मृत ५० ते ८० या वयोगटातील आहेत. तर राजापूरमधील एका ४२ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. मृतांचा आकडा ५५२ वर पोहचला आहे. दरम्यान आतापर्यंत रत्नागिरीत १३७, खेड ७८, गृहागर २३, दापोली ५७, चिपळूण ११७, संगमेश्वर ८२, लांजा २२, राजापूर ३०, मंडणगडमध्ये ६ जणांचा मृत्यू कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.