रत्नागिरी - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. नव्याने 48 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 960 वर पोहचली आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णामध्ये लोटे येथील घरडा केमिकल्सच्या 40 जणांचा, रत्नागिरी येथील 3 आणि लांजा येथील 5 जणांचा समावेश आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 634 जणांनी कोरोनावर मात केली तर 33 जणांना आपला जीव गमवावा लागला. सध्या 293 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अॅक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन -
जिल्ह्यात सध्या 75 अॅक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यातील 22, दापोलीतील 8, खेडमधील 14, लांजामधील 5, चिपळूणमधील 20, मंडणगडमधील 1 आणि राजापूरमधील 5 गावांमध्ये कन्टेन्मेंट झोन आहेत. मुंबईसह इतर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंन्टाईन केले जाते. 13 हजार 102 इतकी लोक होम क्वारंन्टाईन आहेत.
दरम्यान, देशातील कोरोनाचा प्रसार वाढत असून गेल्या 24 तासात उच्चांकी वाढ नोंदवण्यात आली. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित असून आत्तापर्यंत एकूण 2 लाख 67 हजार 665 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 1 लाख 7 हजार 963 जण अॅक्टिव्ह रूग्ण आहेत तर 1 लाख 49 हजार 7 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. 10 हजार 695 रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.