रत्नागिरी - तुमचे एटीएम ब्लॉक झाले आहे, असे सांगून ६६ वर्षीय वृद्धाला ३८ हजार ९९९ रूपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अच्युत बळवंत पाटणकर असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटणकर यांच्या मोबाईलवर सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता एक फोन आला. यावेळी तुम्ही एटीएम वापरता का? असा सवाल करत एटीएमसंबधीच्या समस्या अज्ञाताने सांगितल्या. त्यानंतर पाटणकर यांनी बँकेत जाऊन खात्री करतो असे म्हटले. यावर तुम्ही बँकेत जाईपर्यंत तुमचे एटीएम ब्लॉक होईल असे सांगण्यात आले. यानंतर तुमच्या एटीएमची माहिती द्या, असे सांगून एटीएमबाबत सर्व माहिती घेऊन पाटणकर यांची ३८ हजार ९९९ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली.
याप्रकरणी अच्युत बळवंत पाटणकर यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात हिंदी भाषिकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान असा कोणताही निनावी फोन आल्यास आपल्या एटीएम कार्डची माहिती देऊ नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी केले आहे.