रत्नागिरी - दिल्ली येथील निजामुद्दीन मरकझमध्ये रत्नागिरीतील तीन नागरिक सहभागी झाले होते. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे. त्या तिघांपैकी एकाला मुंबईत आणि एकाला आग्रा येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर एकावर जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना कक्षात उपचार सुरू आहेत, अशी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
हेही वाचा... देशात चर्चा ! हे 'मरकझ' आणि 'तबलिगी जमात' म्हणजे नेमकं काय?
दिल्लीतील निजामुद्दीन मरकजमध्ये महाराष्ट्रातील शेकडो नागरिक सहभागी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून सध्या त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातून देखील काही व्यक्ती दिल्ली गेली असल्याची चर्चा दोन दिवसांपासून सुरु होती. याबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी माहिती दिली आहे. 'दिल्लीतील त्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील तिघेजण गेले होते. तिघांपैकी एक जण मुंबई, तर एक जण आग्रा येथे क्वारंटाईन आहे. तर एकावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत' असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. त्यातच दिल्लीतील निजामुद्दीन दर्ग्यात झालेल्या 'मरकझ' या धार्मिक कार्यक्रमातून अनेकांना कोरोना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने कोरोनाबद्दल किती बेफिकिरी दाखवली जात आहे, हे समोर येत आहे.