रत्नागिरी - दापोली तालुक्यातील हर्णे खेम धरणाच्या दुरुस्तीसाठी 3 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे. या धरणाला ठिक-ठिकाणी गळती लागली होती. तसेच जिल्ह्यातील काही धरणांना गळती लागली आहे. त्यामुळे तिवरे धरण दुर्घटनेनंतर प्रशासनाला अखेर जाग आली आहे
दापोली तालुक्यातील हर्णे खेम धरण सध्या जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे. हे धरण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी बांधले आहे. 1972 साली बांधण्यात आलेल्या या धरणाच्या भिंतीला सध्या ठीक-ठिकाणी गळती लागली आहे. काही ठिकाणी तर भिंतीला भगदाड पडली आहेत. दिवसेंदिवस हे भगदाड वाढत आहे. त्यामुळे हर्णे, पाजपंढरी, अडखळ या 3 गावांना याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या धरणाकडे सरकारने वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ गेल्या अनेक दिवसांपासून करत होते.
अखेर या धरणाच्या दुरूस्तीसाठी जलसंपदा विभागाने 3 कोटी रुपये मंजूर केले आहेत. जलसंपदा विभागच या धरणाच्या दुरुस्तीचे काम करणार असल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली.