रत्नागिरी - कोरोना विषाणूशी लढणार्या रत्नागिरी नगरपरिषदेचे 39 अधिकारी, कर्मचार्यांना प्रत्येकी 25 लाख रुपयांच्या विम्याचे कवच मिळाले आहे. नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. कर्मचार्यांचा विमा उतरविणारी रत्नागिरी ही राज्यातील पहिली नगरपरिषद असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनाशी लढणार्या आरोग्य, पोलीस, नर्स, आशा वर्कर्स हे कोरोना योद्धा म्हणून लढत आहेत. त्यांच्याबरोबर नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारीही कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी कर्तव्यावर आहेत. त्यांना या विम्याचे संरक्षण देण्यात आले आहे. रत्नागिरी नगरपरिषदेने एलआयसी या शासनमान्य कंपनीचा 'जीवन अमर टर्म इन्शुरन्स' विमा उतरविला आहे. नगरपरिषदेतील 39 अधिकारी, कर्मचार्यांना या विम्याचे कवच मिळाले आहे. विम्याची रक्कम 25 लाख प्रती कर्मचारी आहे. कोरोना प्रादुर्भाव असेपर्यंत नगरपरिषदेमार्फत हे संरक्षण राहणार आहे. त्यासाठी पालिकेमार्फत प्रत्येक वर्षी प्रत्येक कर्मचाऱ्याचा 7 हजार 760 हप्ता भरण्यात येणार आहे. याचा एकूण खर्च 2 लाख 99 हजार 130 रुपये एवढा आहे. कोरोना विषाणूबाबतचे कर्तव्य बजावताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू झाल्यास संबंधित कर्मचार्यांना 25 लाखाचें विमा कवच मिळणार आहे.