रायगड- महाड शहरातील काजळपुरा परिसरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटना प्रकरणी आणखी एका आरोपीला महाड पोलिसांनी अटक केली आहे. युनूस शेख असे या आरोपीचे नाव आहे. त्याला माणगाव न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यत आरसीसी सल्लागार बाहुबली धमाणे आणि युनूस शेख या दोघांना अटक झाली आहे. यातील मुख्य आरोपी फारुक काझी हा फरार आहे. 3 जणांना ताब्यात घेणे बाकी आहे. युनूस शेख हा जखमी असल्याने त्याला अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.
24 ऑगस्टला सायंकाळी तारिक गार्डन इमारत दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेबाबत बांधकाम व्यावसायिक फारुक काझी, आरसीसी सल्लागार बाहुबली धमाणे, वास्तुविशारद गौरव शहा, तत्कालीन महाड नगरपालिका मुख्याधिकारी दीपक जिंदाड, अभियंता शशिकांत दिघे, या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील बाहुबली धमाणे याला यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा- महाड इमारत दुर्घटना : आरोपी बाहुबली धमाणेला 5 दिवसांची पोलीस कोठडी
युनूस शेख हा बिल्डर फारुक काझी याचा महाड मधील स्थानिक साथीदार होता. त्यानेच बिल्डींग मधील फ्लॅट विकण्यास काझी याला मदत केली होती. बिल्डरच्या व्यवसायात सहकारी नसला तरी युनूस त्याचे सर्व काम पाहत होता, असे तारिक गार्डनच्या रहिवाशांनी पोलिसांना सांगितले होते. त्यानुसार युनूस शेख याला महाड पोलिसांनी सहावा आरोपी करुन अटक केली.
हेही वाचा-रायगडमधील अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे प्रशासनाचे आदेश
युनूस शेख याला माणगाव न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. युनूस शेख हा आधी एका झालेल्या अपघातात जखमी असून पायाला मार लागला आहे. त्यामुळे न्यायालयातून त्याला अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.