रायगड - बदलापूर येथील राहणाऱ्या तरुणाचा नेरळ येथील उल्हासनदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत तरुणाचे नाव सुधीर अडागळे आहे. सुधीर हा बदलापूर - खरवाई येथील रहीवासी असल्याचे समजते आहे. नेरळ पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने उल्हासनदी पात्रात शोध घेऊन मृत सुधीरचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.
मिळालेल्या माहितीनुसार 8 एप्रिलला गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास सुधीर व त्याचे अन्य तीन साथीदार असे चार जण कर्जत तालुक्यातील नेरळ बोपेले येथील उल्हास नदीतीरी फिरण्यासाठी रिक्षाने आले होते. आपण आणलेले वाहन पार्क करून नदीच्या पात्राजवळ पार्टी करत असताना पोहण्यासाठी म्हणून सुधीर बरोबर अन्य साथीदार देखील पाण्यात उतरले होते. मात्र, खोलीचा अंदाज न आल्याने आपला साथीदार बुडत असल्याचे पाहून सुधीरने त्या साथीदाराला वाचवले. परंतु साथीदार बाहेर आल्यावर सुधीर कुठे दिसून येत नसल्याने मित्रांनी याबाबत स्थानिक गावकरी व पोलिसांना या बाबत माहिती दिली.
घटनास्थळी नेरळ पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने नदीपात्रात शोध घेण्यास सुरुवात केली, मात्र, 8 एप्रिल सायंकाळी उशीरापर्यंत सुधीर कुठेही सापडून न आल्याने काळोखात शोधणे कठीण झाले. यामुळे पोलिसांनी शोध मोहीम थांबवली होती. 9 एप्रिलला सकाळी नऊच्या सुमारास सुधीरचा मृत देह पिंपलोली पुला जवळ दिसून आला.
यावेळी अतिरिक्त उपविभागीय अधिकारी सुहास शिंदे, नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुळीक व पोलीस कर्मचारी यांनी स्थानिकांच्या मदतीने सुधीरचा मृतदेह बाहेर काढला असून या बाबत अधिक तपास नेरळ पोलीस करत आहेत.