रायगड- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी शासन सर्वोत्तपरी खबरदारी घेत आहे. सगळीकडे संचारबंदी लागू केली असून घरातून कोणीही बाहेर पडू नये, असे आवाहन केले जात आहे. परराज्यातील कामानिमित्त जिल्ह्यात आलेले कामगारांनीही जिल्हा सोडून जाऊ नये. त्यांच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. आहेत त्याठिकाणीच रहा, रायगड हाच तुमचा आता जिल्हा असून महाराष्ट्र हे राज्य आहे, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले आहे.
हेही वाचा- सर्व लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात, शासकीय कर्मचाऱ्यांनाही मार्चमध्ये 50 ते 75 टक्केच वेतन
जिल्ह्यात परराज्यातील हजारो कामगार कामानिमीत्त आलेले आहेत. मात्र, कोरोना विषाणूमुळे या कामगारांवर आता उपसमारीची वेळ आली आहे. काम बंद असल्याने त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे शासनाने अशा परराज्यातील मजूर, कामगारांना मदत करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. रायगड जिल्ह्यात कर्नाटक, बिहार, आंध्रप्रदेश, पश्चिम महाराष्ट्रातून कामगार कामानिमीत्त आलेले आहेत. त्यांना जिल्हा प्रशासन, स्थानिक प्रशासन खाण्या-पिण्याच्या वस्तू वाटप करीत आहेत. तर त्याच्या राहण्याचीही सोय प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
प्रशासनासोबत सामाजिक संस्था, मंडळे, व्यापारी यांनीही मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात परराज्यातील मजूर, कामगार यांच्या पोटा-पाण्याचा, राहण्याचा प्रश्न प्रशासनाकडून सोडविला जात आहे.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज आठवा दिवस आहे.