रायगड - विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांनी महिला उमेदवारांना पहिली पसंती दिली आहे. जिल्ह्यातील श्रीवर्धन, अलिबाग, पेण मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी या राष्ट्रीय पक्षांनी महिला उमेदवारांना संधी दिली आहे. तीनही महिला उमेदवारांसमोर बंडखोरांचे मोठे आव्हान असून त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अदिती तटकरे, अॅड. श्रद्धा ठाकूर आणि नंदा म्हात्रे या तीनही उमेदवार याचा कसा सामना करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात दरवेळी राजकीय पक्षांकडून पुरुष उमेदवार दिले जातात. एखादा अपवाद वगळता आजपर्यंत सातही विधानसभा मतदारसंघात पुरुष उमेदवारच निवडून आले आहेत. मात्र, यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने महिलांना आमदारकीची उमेदवारी दिली आहे. शेकापने याआधी मीनाक्षी पाटील यांना संधी दिली होती. त्यावेळी मीनाक्षी पाटील या अलिबाग विधानसभा मतदारसंघात विजयी झाल्या होत्या.
हेही वाचा - अदिती तटकरे, विनोद घोसाळकर यांचे उमेदवारी अर्ज वैध
काँग्रेस पक्षाने अलिबाग आणि पेण मतदारसंघात महिला उमेदवार दिले आहेत. अलिबाग विधानसभा मतदारसंघात अॅड. श्रद्धा ठाकूर यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी दिली आहे. मात्र, त्याठिकाणी त्यांचे दिर राजेंद्र ठाकूर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अॅड. श्रद्धा ठाकूर यांचे सासरे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी आपला पुत्र राजेंद्र ठाकूर यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अलिबागमधील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते हे राजेंद्र ठाकूर यांच्यासोबत आहेत. त्यामुळे अधिकृत काँग्रेसच्या उमेदवार अॅड. श्रद्धा ठाकूर यांना स्वपक्षीयाची बंडखोरी तसेच शेकाप, शिवसेना उमेदवारांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
हेही वाचा - रायगड : काँग्रेस-राष्ट्रवादीचा बंडखोरांना सज्जड दम, उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास पक्षातून हकालपट्टी
पेण मध्ये काँग्रेसने नंदा म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र पाटील हे भाजपात गेल्याने काँग्रेसची ताकद काही प्रमाणात कमी झाली आहे. तर दुसरीकडे शेकापचे वर्चस्व पेण मतदारसंघात आहे. त्यामुळे नंदा म्हात्रे या राजकीय परिस्थितीत विरोधकांचे आव्हान कसे पेलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - रायगडात महायुती, आघाडीच्या उमेदवारांनी भरले उमेदवारी अर्ज
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने अदिती तटकरे यांना संधी दिली आहे. या मतदारसंघात पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्षाने महिलेला संधी दिली आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या अदिती तटकरे या कन्या असून या लढतीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. अदिती तटकरे यांच्या विरोधात शिवसेनेचे कडवे आव्हान असताना आघडीतील काँग्रेस पक्षातील तीन जणांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे एकीकडे बलाढ्य शिवसेना, मित्रपक्षातील बंडखोरी यांचे आव्हान अदिती तटकरे या कशा पद्धतीने पेलणार हे निकालानंतर कळणार आहे.
हेही वाचा - महाड विधानसभा आढावा: पुन्हा रंगणार गोगावले विरुद्ध जगताप सामना
जिल्ह्यात अदिती तटकरे, अॅड. श्रद्धा ठाकूर, नंदा म्हात्रे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. मात्र, या तीनही महिला उमेदवारांना बंडखोरी आणि विरोधकांचे आव्हान यावर मात करून आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. त्यामुळे श्रीवर्धन, अलिबाग, पेण येथील मतदार महिलेला विधानसभेत नेतृत्व करण्याची संधी देणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.