रायगड : अनेकवेळा रेल्वे वा वाहनात महिलेची प्रसूती झाल्याच्या घटना घडत असतात. अशीच एक घटना रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यातील विहुले कोंड येथे घडली आहे. एका महिलेची मुदतीपूर्वी प्रसूती धावत्या एसटीमध्ये झाली आहे. बस एसटी चालक, वाहक आणि बसमधील महिलांनी प्रसंगावधान राखून वैष्णवी विकास शिगवण (32) हिची सुखरूप प्रसूती केली असून बाळ आणि माता सुखरूप आहे. तिच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महिलेला बसमध्येच सुरू झाल्या वेदना -
श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन कोंड येथे राहणारी वैष्णवी शिगवण ही गरोदर होती. श्रीवर्धन कोंड येथून ही महिला सकाळी माणगाव येथे एका रुग्णालयात सोनोग्राफी करण्यास आली होती. त्यानंतर तपासणी करून वैष्णवी ही माणगाव बस स्थानकातून घरी जाण्यास आली. माणगाव म्हसळा या एसटी बसमध्ये बसून त्या घरचा प्रवास करू लागली. त्याचवेळी एसटी बस विहुले कोंड येथे आली असता वैष्णवी हिला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि बसमध्येच तिची प्रसूती झाली.
रायगडमध्ये महिलेने धावत्या एसटी बसमध्ये दिला बाळाला जन्म.. प्रवाशी महिलांनी केली एसटीत प्रसूती - वैष्णवी हिला बसमध्ये प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर एसटी चालक आणि वाहक यांनी बस रुग्णालयात नेण्यास तत्परता दाखवली. मात्र वैष्णवी हिला अति प्रसूती कळा सुरू झाल्याने एसटी बसमधील महिलांनी एकत्रित येऊन तिची प्रसूती केली. त्यानंतर चालकाने एसटी बस साई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेली. त्याठिकाणी बाळ आणि मातेला रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. संदीप भालके यांनी प्राथमिक उपचार केले. मात्र वैष्णवी हिची प्रसूती मुदतीपूर्वीच झाल्याने बाळाचे वजन कमी भरले. त्यामुळे पुढील उपचारासाठी वैष्णवी आणि बाळाला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
एसटी चालक आणि वाहकाने दाखविले प्रसंगावधान - वैष्णवी आणि बाळ हे सुखरूप असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एसटी चालक, वाहक आणि प्रवाशी यांनी प्रसंगावधान राखून त्वरित महिलेची मदत केल्याने दोघेही सुखरूप आहेत.
हेही वाचा - नाशिकमध्ये महिला सावकाराची दंबंगिरी; आदिवासी दाम्पंत्यास अमानुष मारहाण