रायगड- जिल्ह्यात गेले आठ दिवस पावसाने थैमान घातले होते. मुसळधार पावसाने जिल्ह्यात सर्वच भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. भितीपोटी जिवाच्या आकांताने मदतसाठी याचना करीत होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्याच्या तत्परतेमुळे तब्बल २ हजार नागरिकांना सुखरुप सुरक्षित स्थळी हलविण्यात यश आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशींनी तत्परता दाखवत नियोजनबद्ध सूत्र हलवली. एनडीआरएफ, भारतीय सैन्य दल, कोस्टल गार्ड, पोलीस, सामाजिक संस्था, राफटरच्या व आपत्ती व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. यावेळी नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यात जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यशस्वी झाले.
जिल्ह्यात आठ दिवसापासून मुसळधार पाऊस पडत होता. या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांनी आपली धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे नद्या नागरी वस्तीतून वाहत होत्या. पेण, महाड, पोलादपूर, रोहा, माणगाव, तळा या तालुक्यात हजारो नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. सगळीकडे पाणी आणि त्यामध्ये नागरिक अडकलेले. अशी भयावह परिस्थिती असताना जिल्हा प्रशासनाने ही परिस्थिती उत्तमरित्या हाताळली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक हे जिल्हाधिकारी कार्यालयातून बचाव कार्यावर लक्ष ठेऊन होते. तर जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे सुद्धा जिल्ह्यातील पाण्यात अडकलेल्यांच्या मदतीसाठी सूत्रे हलवत होते. स्थानिक नागरिकही पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी पुढे येत होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार एनडीआरएफ, कोस्टल गार्ड, भारतीय सैन्य दल यांची पथके जिल्ह्यात सक्रिय केली होती. तसेच पोलीस, वाईल्डर वेस्ट क्लब, सामाजिक संस्था, नगरपरिषद प्रशासन यांनी बोटीच्या सहाय्याने दोन हजार लोकांना रेस्क्यू करून सुरक्षित स्थळी हलविले. पेण तालुक्याच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड व तहसीलदार अपर्णा जाधव या महिला अधिकाऱ्यांनी स्वतः सक्रिय राहून तालुक्यातील पूरस्थिती उत्तम प्रकारे हाताळली. पुरग्रस्त भागात स्वतः हजर राहून नागरिकांना धीर दिला. त्यामुळे जिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच सर्व महसूल कर्मचारी, पोलीस या सर्वच शासकीय यंत्रणेच्या तत्परतेने जिल्ह्यातील पूर परिस्थितीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी तत्परता गाखविल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.