रायगड - किल्ले रायगडच्या संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी राज्य शासनाने साडे सहाशे कोटी रुपये मंजूर केले आहेत. भाजप सरकारच्या काळात पाच वर्षात फक्त 59 कोटी निधी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला होता. नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत किल्ले रायगडसाठी २० कोटींचा निधी मंजूर केला. मात्र, ३ महिने उलटले तरी अद्याप हा निधी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेला नाही. त्यामुळे हा निधी कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबाबत राज्य शासनाकडून तातडीने पावले उचलली जात नसल्याचे समोर आले आहे. किल्ले रायगडाला गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी किल्ले रायगड विकास प्राधिकरण आराखडा निर्माण करून त्याद्वारे कामे करण्यात येत आहेत. किल्ले रायगडच्या संवर्धन, सुशोभीकरण आणि उत्खननाची कामे सध्या किल्ले रायगडावर सुरू आहेत. तर किल्ले रायगडला जोडणाऱ्या रस्त्याची कामेही सुरू झालेली आहेत.
किल्ले रायगडच्या सुशोभीकरण आणि संवर्धनासाठी साडे सहाशे कोटींची तरतूद भाजप सरकारच्या काळात करण्यात आलेली आहे. मात्र, आतापर्यंत 59 कोटींचा निधीच जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेला आहे. भाजप सरकार सत्तेवरून गेल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर बसले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत किल्ले रायगडासाठी 20 कोटींच्या निधीला मंजुरी दिली. त्यामुळे शिवभक्तामध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. महाविकास आघाडीने जलद गतीने निर्णय घेऊन निधीची घोषणा केली असली तरी ३ महिने उलटले तरी 20 कोटींचा निधी अद्याप जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेला नाही. त्यामुळे किल्ले रायगडावरील अनेक कामे आजही रखडलेली आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवजयंती दिवशी किल्ले शिवनेरीच्या संवर्धनासाठी 23 कोटींची घोषणा केली आहे. मात्र, किल्ले रायगडासाठी घोषीत केलेला निधी कधी प्राप्त होणार याबाबत जिल्हा प्रशासनालाही माहीत नाही. हा 20 कोटींचा निधी पर्यटना विभागाकडून मिळणार की वित्त विभागाकडून या संभ्रमात शासन अडकले असल्याचे दिसत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने शासन चालवले जात आहे. मात्र, त्यांच्या किल्याच्या संवर्धन कामासाठी वेळेत निधीची पूर्तता केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शासनाच्या या उदासीनतेमुळे किल्ले रायगडला गतवैभव कधी प्राप्त होणार? हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. तर किल्ले रायगडासाठी लवकरात लवकर निधीची पूर्तता व्हावी, अशी शिवभक्तांची मागणी आहे.
प्राधिकरणयासंदर्भात बैठक पार पडली असून, निधी वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच जिल्हाधिकारी यांच्याकडे निधी वर्ग होणार असल्याची माहिती राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. त्यामुळे किल्ले रायगड संवर्धनाचे काम रखडणार नाही असेही त्या म्हणाल्या.