रायगड - मान्सून महाराष्ट्रात दाखल व्हायला आणखी 2 ते 3 दिवस बाकी आहेत. तरी रायगड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीय. त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
येत्या 48 तासात हे वादळी वारे वाहणार असून त्याचा वेग हा ताशी 30 ते 40 किलोमीटर इतका असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यांबरोबर रायगडच्या किनाऱ्यावर मोठया लाटा उसळण्याची शक्यता आहे. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन आणि उरण या किनारपट्टीवरील 4 तालुक्यांमध्ये लाटांच्या माऱ्यांमुळे धोका संभवतो. शाळा महाविद्यालये सुरू होण्यास काही दिवसच बाकी असल्याने शेवटच्या टप्प्यात पर्यटक मोठ्या संख्येने रायगडच्या किनारपटटीवर दाखल झाले असल्याने या पर्यटकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
वादळी वाऱ्यांचा संभाव्य वेग पाहता यात झाडे उन्मळून पडून अपघात होवू शकतात. तसेच महामार्गावर झाडे कोसळून वाहतूक कोंडीची देखील शक्यता आहे. कच्ची किंवा जुन्या घरांनाही या वादळापासून धोका संभवतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनाने केले आहे.