रायगड - पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील गेली अनेक वर्षे रखडलेला पाणी प्रश्न वर्षाभरात सुटणार आहे. यासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरेंनी पुढाकार घेतला आहे. आज शहापाडा धरण, वाशी, शिर्कि याठिकाणी खासदार सुनील तटकरेंनी पाहणी केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेतून 30 कोटी खर्च करून हेटवणे धरणातून शहापाडा धरणात पाणी आणून ते खारेपाट गावातील 50 गावांना पाईप द्वारे पोहचविण्यात येणार आहे. त्यामुळे या गावांचा पाणी प्रश्न वर्षभरात संपणार असल्याचे खासदार सुनील तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
'पाण्याचा प्रश्न वर्षभारात सोडवला जाईल' -
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता सुधीर वेंगुर्लेकर, सरपंच, अधिकारी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. ग्रामस्थांनी आपल्या पाण्याच्या समस्यांचा पाढा खासदार सुनील तटकरेंच्या पुढे मांडला. पाण्याचा प्रश्न हा वर्षभरात सोडविला जाईल असे आश्वासन तटकरेंनी दिले आहे.
50 गावांना टँकरद्वारे केला जातो पाणी पुरवठा -
पेण विभागातील खारेपाट विभागाला पाणी पुरवठा करण्यासाठी 55 वर्षापूर्वी शहापाडा येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत धरण बांधण्यात आले आहे. त्यानंतर हे धरण रायगड जिल्हा परिषदेकडे देण्यात आले. मात्र, तरीही खारेपाट भागातील 50 गावे ही आजही पाण्यापासून वंचित राहिली आहेत. जानेवारी महिन्यापासून या गावात पाणी टंचाई समस्या सुरू होऊन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे ही गावे आजही पाण्यापासून वंचित राहिली आहेत.
हेटवणे धरणातून पाणी आणणार शहापाडा धरणात -
खारेपाट भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत खासदार सुनील तटकरेंच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. य बैठकीत खारेपाट विभागातील पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी चर्चा झाली. महाराष्ट्र्र जीवन प्राधिकरणमार्फत आता 30 कोटी खर्च करून हेटवणे धरणातून 9 दशलक्ष घन मीटर पाणी शहापाडा धरणात आणून सोडले जाणार आहे. शहापाडा धरणातून पाईपद्वारे हे पाणी 50 गावांना पुरविले जाणार आहे. यासाठी तातडीचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरेंनी दिली.