रायगड - विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात सकाळपासून मतदान सुरू झाले आहे. सकाळच्या वेळी मतदान केंद्रावर तुरळक गर्दी होती. दिव्यांग व सखी मतदान केंद्रावर मतदारासाठी चोख सुविधा करण्यात आलेली आहे. मतदान केंद्रावर मतदारासाठी सेल्फी पॉईंटही उभे करण्यात आले आहेत. नव मतदारांनीही पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. दिव्यांग मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारासाठी चेअरची सुविधा केलेली आहे. जिल्ह्यात शांततेत मतदान सुरू झाले आहे.
हेही वाचा- अमोल यादवांच्या मेक इन इंडिया 'उड्डाणा'ला पंतप्रधान मोदींकडून हिरवा कंदील
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.
राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.
या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.