रायगड - पनवेल आणि उरण हे विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघाचा भाग आहेत. या दोन्ही मतदारसंघात मतांची टक्केवारी घसरल्याचे समोर आले आहे. पनवेल येथे ५५.३ टक्के तर उरण येथे ६१.८ टक्के मतदान झाले. पनवेल आणि उरण दोन्ही ठिकाणी शिवसेना भाजप युतीचे वर्चस्व आहे. या घटलेल्या टक्केवारीचा कोणाला फायदा किंवा तोटा होतो हे येत्या २३ मे ला स्पष्ट होईल.
मावळ मतदारसंघ हा राज्यातील महत्वाच्या मतदारसंघापैकी एक मानला गेला. कारण, येथून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ निवडणूक लढत होते. म्हणजे अप्रत्यक्षरित्या अजित पवार यांचीच प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे. पनवेल आणि उरण हे दोन्ही मतदारसंघ भाजपचे वर्चस्व असणारे आहेत. त्यामुळे साहजिकच आघाडीसाठी येथे मोठे आव्हान होते. पण, येथील मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसले.
मतदानाची टक्केवारी घटली असली, तरी पनवेल विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरूवात झाली. ९ वाजेपर्यंत ५.७२ टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदारांची गर्दी वाढली. ११ वाजेपर्यंत १७.१३ टक्के मतदान झाले. त्यानंतर दुपारी १ पर्यंत ३०.३७ टक्के,दुपारी ३ पर्यंत ४०.६३ टक्के, सायंकाळी ५ पर्यंत ४९.३७ टक्के आणि सायंकाळी ६ पर्यंत ५५.३ टक्के इतके मतदान झाले.
यावर्षी पनवेलमधील मतदानाचा टक्का घसरला आहे. अन्य विधानसभा मतदार संघातील टक्काही घसरला आहे. परंतु थेट प्रशांत ठाकुरांच्याच घरच्या मतदारसंघातच टक्केवारी घसरल्याने चर्चेचा विषय झाला आहे. ही टक्केवारी घसरण्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न आता करावा लागणार असून, याचा फटका विधानसभेलाही बसू शकतो. याची जाणीव आता येथील उमेदवाराला ठेवावी लागणार आहे.