रायगड - मावळ लोकसभा मतदार संघातील पनवेल, कर्जत, उरण या दुर्गम गावांत मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे मावळ लोकसभा मतदार संघातील दुर्गम असलेल्या कर्जत, उरण या भागात 67 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. काही ठिकाणची इव्हीएम यंत्रे नादुरुस्त झाल्याने ती तातडीने बदलण्यात आली. त्यामुळे मतदानाचा कुठेही खोळंबा झाला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. यावेळी त्यांनी मतदान प्रक्रियेत कर्तव्य बजावलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पोलीस दलाचे आभारही मानले.
मावळ मतदार संघात 59.49 टक्के मतदान झाल्याची माहितीही मावळच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली. मावळ मतदार संघात 22 लाख 97 हजार 405 मतदार असून पनवेल, कर्जत, उरण या रायगड जिल्ह्यातील तीन मतदार संघात मिळून 11 लाख 9 हजार 250 मतदार आहेत. या मतदानात दिव्यांग, ज्येष्ठ तसेच तरुण आणि महिलाही उत्साहाने सहभागी झालेले दिसले. आदिवासी मतदारांनी उत्साहाने मतदान केले.
सोमवारी रात्रीपासूनच ठिकठिकाणाहून मतदान यंत्रे त्या-त्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा होऊन, बालेवाडी येथे स्ट्राँग रूममध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. 23 मेला याठिकाणी मतमोजणी होणार आहे.
पनवेलमध्ये 5 लाख 39 हजार 187 मतदारांपैकी 2 लाख 98 हजार 349 मतदारांनी म्हणजे 55.33 टक्के, कर्जतमध्ये 2 लाख 79 हजार 790 मतदारांपैकी 1 लाख 89 हजार 570 मतदारांनी म्हणजे 67.76 टक्के, उरणमध्ये 2 लाख 90 हजार 273 मतदारांपैकी 1 लाख 95 हजार 101 मतदारांनी म्हणजे 67.21 टक्के मतदान झाले.
दुर्गम ठिकाणच्या गावातही चांगला प्रतिसाद
कर्जतमधील तुंगी, पेठ, कळकराई, ढाक या 4 दुर्गम भागातील मतदान केंद्रांवर सोमवारी परिश्रमपूर्वक सर्व साहित्य घेऊन पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांचे पथक देखील यशस्वीरित्या सर्व मतदान प्रक्रिया आटोपून सोमवारी उशिरा सायंकाळी परतले. या पथकाने देखील चांगली कामगिरी केली असून त्याठिकाणी उत्तम मतदान झाल्याची माहिती कर्जतच्या उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी यांनी दिली. या पथकांशी त्यांचा सातत्याने संपर्क सुरु होता.