रायगड - वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर ई-चलनाद्वारे जिल्हा वाहतूक शाखेच्यावतीने कारवाई करण्यात आली. यात वाहतूक नियम तोडलेल्या दीड हजार वाहन चालकांवर दंड आकारत कारवाई झाली. मात्र, दंड आकारणी करूनही वाहनधारकांनी हा दंड भरला नाही. त्यामुळे सुमारे एक कोटी रुपयांचा दंड थकीत आहे. आता ज्या वाहन चालकांनी दंड भरलेला नाही त्यांना तातडीने दंड भरण्याची नोटीस जिल्हा वाहतूक शाखेकडून करण्यात आली आहे.
वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सातत्याने निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वाहतूक शाखा असण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार, जिल्ह्यात जिल्हा वाहतूक शाखा तयार करण्यात आली. सध्याचे जिल्हा वाहतूक निरीक्षक सुरेश वराडे हे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शंभरहून अधिक वाहतूक पोलीस जिल्ह्यात तैनात करण्यात आले आहेत.
हेही वाचा - चंद्रपुरात तहसीलदारांसमोरच शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईची मोहीम जिल्हा वाहतूक शाखेद्वारे राबविली जात आहे. मात्र, काही वाहन चालक दंड चुकविण्याचा वारंवार प्रयत्न करीत असतात. त्यामुळे जिल्ह्यात वाहतूक पोलिसांसाठी ई-चलन दंडाची कारवाई सुरू केली. मोबाईल अॅपच्या माध्यमातून वाहनाचा फोटो काढून त्याची सविस्तर माहिती अॅपवर मिळवून कारवाई केली जाते. कारवाई केल्यानंतर चालकाच्या अथवा गाडी मालकाच्या मोबाईलवर दंड आकारणीचा संदेश गेलेला असतो. त्यानुसार त्यांनी हा दंड जिल्हा वाहतूक शाखेत भरणे महत्वाचे असते.
हेही वाचा - घृणास्पद..! वर्षभर 'तो' करत होता मुलीवर लैंगिक अत्याचार, आई देत होती नराधमाला साथ
जिल्ह्यात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविणाऱ्या दीड हजार वाहन चालकांवर ई-चलनाद्वारे कारवाई करण्यात आली. त्यात हेल्मेट नसणे, वाहन वेगात चालविणे, ट्रिपल सीट बसणे, नेमप्लेट नसणे, मोबाईलवर बोलणे इत्यादी नियमांचा समावेश आहे. मात्र, वाहन चालकांकडून अद्याप दंड भरण्यात आलेला नाही. यामुळे एकूण १ कोटी रुपयांचा दंड थकीत आहे. थकीतदारांना ऑनलाईन स्वरुपात नोटीस बजावण्यात आली आहे. न भरलेला दंड 8 ते 15 दिवसात दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.