रायगड - कोरोनाचे महाभयंकर संकट अजूनही टळले नसताना यात अवकाळी पावसाने भर घातली आहे. खालापूर तालुक्यात आज सायंकाळी 6 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास ढगांचा कडकडाट व वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे तालुक्यातील नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
हेही वाचा - रायगड जिल्ह्यातील बाजारपेठा गर्दीने फुल्ल; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
प्रचंड उष्णता, ढगाळ वातारण या हवामान बदलानंतर आज पाऊस आल्याने तालुक्यात गारवा निर्माण झाला. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचे संकट उभे असताना आता अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे, या पावसालाही आत्ताच यायचे होते का? अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून येऊ लागली आहे.
प्रचंड उष्णता, ढगाळ वातावरण आणि आता अवकाळी पाऊस, हे हवामानातील बदल कोरोना परिस्थितीत आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील बाजारपेठेत गर्दी
दरम्यान, कोरोना रुग्णसंख्येची वाढती चिंता पाहता राज्यशासन पुन्हा आठ ते पंधरा दिवसांची संचारबंदी लागू करण्याच्या विचारात आहे. राज्याच्या टास्क फोर्स बैठकीतही संचारबंदी लागू करण्याबाबत एकमत झाले आहे. त्यामुळे, पुढील दोन दिवसांत राज्यात मुख्यमंत्री कडक संचारबंदी लागू करणार असल्याचे बोलले जात आहे. पुन्हा संचारबंदी लागू होणार म्हणून रायगड जिल्ह्यातील बाजारपेठेत नागरिकांनी खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळले. खरेदी करताना मात्र सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा होत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे, पुन्हा रुग्णसंख्या वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
हेही वाचा - उल्हासनदी पात्रात बदलापूर येथील तरुणाचा बुडून मृत्यू