सांगली - 'साहेब लेकरासारख्या बागा वाढवल्या. राब राब राबलो. लय मोठी आशा होती. पण निसर्गानं एक झटका दिला अन् होत्याचं नव्हतं झालं. आता जीव संपवण्याशिवाय पर्याय नाही', अशा शब्दात विटा येथील शेतकऱ्याने उद्धव ठाकरेंसमोर आपली व्यथा मांडली. यावेळी त्या शेतकऱ्याला रडू देखील कोसळले. त्यावर आता तुम्ही रडायचे नाही, फक्त लढायचे असा धीर उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला.
उद्धव ठाकरे यांनी आज शुक्रवारी विटा येथील रामभाऊ लोटके यांची डाळींबबाग आणि प्रकाश गायकवाड यांच्या द्राक्षबागांची अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी शेतकर्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. या पाहणीदरम्यान नुकसानग्रस्त अनेक शेतकर्यांनी उध्दव ठाकरे यांच्यासमोर अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या व्यथा मांडल्या.
हे वाचलं का? - शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी - उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले, खंबीरपणे आणि मजबूतपणे उभे रहा. खचून जायचे नाही. लवकरात लवकर तुम्हाला कशी मदत करता येईल ते बघू. मनात कसलाही वाईट विचार आणायचा नाही. पुन्हा जिद्दीने उभे रहायचे. सरकार म्हणून आवश्यक ती सर्व मदत करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. राज्यात लवकरच महाशिवआघाडीचे सरकार येणार आहे. त्यामुळे आता अजिबात काळजी करू नका. आपण संपूर्ण कर्जमाफी तर देणार आहोतच. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकर्याला मदत देण्याची आमची भूमिका आहे. शेती आणि शेतकरी हा आमच्या सरकारचा केंद्रबिंदू राहील. तूर्तास नुकसानग्रस्त शेतकर्यांना धीर देणे आणि त्यांना मदत करणे याला शिवसेनेचे प्रथम प्राधान्य आहे. तालुका पातळीवर आणि प्रत्येक गावामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मदत केंद्रे उभारली आहेत. या केंद्राच्या माध्यमातून शासन आणि शेतकरी यांच्यामध्ये दुवा निर्माण करण्याचे काम ही केंद्रे करतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हे वाचलं का? - प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींशीही बोलेन; विदर्भातील पीक नुकसानीच्या पाहणीनंतर पवारांचे आश्वासन
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची माहिती देताना आमदार बाबर म्हणाले, यापूर्वी हा भाग दुष्काळी म्हणून ओळखला जात होता. दुष्काळामुळे पिके करपून जात होती. मात्र, आता अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आमचा शेतकरी मोठा जिद्दी आहे. त्याने दुष्काळात टँकरने पाणी आणून बागा जगविल्या. मात्र, आता हातातोंडाशी आलेल्या बागा या अवकाळी पावसाने उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्याच्या मदतीसाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत.
हे वाचलं का? - देवेंद्र फडणवीसांच्या 'मी पुन्हा येईन' वर शरद पवारांची टोलेबाजी
उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी शिवसेनेच्यावतीने विटा येथील खानापूर रोडला उभारलेल्या शेतकरी मदत केंद्राला भेट दिली. तसेच पाहणी करून शेतकर्यांशी संवाद साधला. यावेळी यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्हे, खासदार विनायक राऊत, माजी मंत्री विजय शिवतारे, कृष्णा खोरे आदी उपस्थित होते.