रायगड - अवैध पिस्तुल बेकायदेशीर बाळगणे आणि विक्री करणे, या प्रकरणी उरण येथे राहणाऱ्या दोन परराज्यातील व्यक्तींना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सेराज रफिक खान (वय २४ वर्षे) व गोविंद लालजित राजभर (वय ३५ वर्षे) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा - हिंगोलीतील काळविट शिकार प्रकरणी शिकारी अद्याप मोकाट
नवी मुंबई पोलिसांना खबऱ्याकडून सेराज रफिक खान यांच्याकडे बेकायदेशीर पिस्तुल असून तो गंगा रसोई हॉटेल जवळ (चिलेगांव ता. उरण, जि. रायगड) येथे येणार असल्याचीबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबईचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावून ट्रक चालक सिराज रफिक खान (मूळ रा. मलिका टोला, जि. मऊ, उत्तरप्रदेश ) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे एक देशी बनावटीचे मेड इन इटली ऑटो पिस्तुल मिळून आले.
पोलिसांनी सेराज खान याच्याकडे चौकशी केली असता, हे पिस्तूल त्याने त्याचा साथीदार ट्रक चालक गोविंद लालजित राजभर (रा.उत्तरप्रदेश) याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. त्यावरून गोविंद यास चिरलेगांव, जासई परिसरात शोध घेवून ताब्यात घेतले. त्याने हे पिस्तूल सेराज रफिक खान यास विकल्याचे कबूल केले. दोघांविरूध्द उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी नवी मुंबई गुन्हे शाखा, मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी.कोल्हटकर, सहायक पोलीस निरीक्षक निलेश तांबे, सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय पवार, पोलीस हवादार शशिकांत शेंडगे, पोलीस नाईक मेघनाथ पाटील, विष्णू पवार यांनी केलेली आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश तांबे हे करीत आहेत.