नवी मुंबई - पनवेल महापालिका क्षेत्रात मंगळवारी २३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ११ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज आढळलेल्या रूग्णांमध्ये खारघरमधील १०, कामोठ्यातील ५, कळंबोलीतील ४ तसेच खिडुकपाडा येथील १, पनवेलमधील २ तर तळोजा येथील एका रूग्णाचा समावेश आहे.
आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण ५६५ कोरोनाबाधित रूग्णांपैकी ३३८ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, २६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे २०१ ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. आज कामोठ्यातील ५, नवीन पनवेलमधील ३, कळंबोलीतील २ तर खारघरमधील एका रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये कामोठे, सेक्टर सी-२१ येथील ६६ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा समावेश आहे. या महिलेला अगोदरपासून रक्तदाब, थायरॉईड व किडनीचा आजार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच खारघर सेक्टर-२, येथील ४६ वर्षीय व्यक्तीचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय नवीन पनवेल येथील ६७ वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीचा सोमवारी मृत्यू झाला असून या व्यक्तीला अगोदरपासूनच रक्तदाबाचा आजार होता. तसेच कळंबोली रोडपाली येथील ४९ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा सोमवारी मृत्यू झाला असून या महिलेला मधुमेहाचा आजार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.