रायगड - जागतिक आदिवासी दिनानिमित्त अलिबाग शहरात आदिवासी बांधवांनी आपली पारंपरिक वेशभूषा करून फेरी काढली. यावेळी आदिवासी बांधवांनी लाकडाच्या मोळ्या, रानभाज्या घेऊन नृत्य केले. शहरात फेरी काढल्यानंतर आदिवासी बांधवांसाठी भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर, कृष्णा पिंगळा, अध्यक्ष भगवान नाईक, जयपाल पाटील व मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते.यावेळी पुरूषांनी आपली पारंपरिक हत्यारे घेऊन, तसेच काठ्यांवर चालून मिरवणुकीत भाग घेतला होता. तर महिला वर्ग डोक्यात रानफुले घालून आदिवासी गाणी आणि संगीतावर ठेका धरून नाचत होत्या.
आदिवासी समाज हा आजही आपली पारंपरिक संस्कृती टिकवून ठेवत आहे. 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. आदिवासी समाज हा पूर्वापार जंगलात राहत आहे. आजही हा समाज डोंगरदऱ्यांत आपल्या कुटूंबासह राहतो. शासनाकडून आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आदिवासींसाठी अनेक योजना शासनस्तरावर आहेत. मात्र आजही हा समाज आर्थिकदृष्ट्या मागासच राहिलेला दिसतो. आदिवासी समाज हा अजूनही मुख्य प्रवाहात पूर्णतः आलेला नाही. त्यामुळे या समाजाने याबाबत पुढच्या पिढीचा विचार करून मुख्य प्रवाहासोबत येऊन आपली प्रगती साधणे गरजेचे आहे.