रायगड - निसर्ग चक्रीवादळाचा कोकणातील जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला. या वादळामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. जिल्ह्यात लाखो घरांचे नुकसान झाले असून जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याकडून या परिसरातील नुकसानीचे पंचनामे करत आहेत. मात्र, आदिवासी वाडीवरील आदिवासी बांधवांच्या झोपडी, घराच्या झालेल्या दुर्दशेकडे पाहण्यासाठी अद्याप कोणीही आलेले नाही. अलिबाग तालुक्यातील किहीम आणि नारंगी चिंचवली आदिवासी वाडीवर वादळाने घरांचे छप्पर उडून मोठे नुकसान झाले आहे. पावसाळा सुरू झाल्याने या आदीवासींना पावसात भिजत राहावे लागत आहे.

निसर्ग चक्रीवादळाने अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, माणगाव, तळा, म्हसळा या तालुक्याला अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे. लाखो नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अलिबाग तालुक्यातील डोंगर भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनाही या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. अलिबाग तालुक्यातील किहीम आदिवासी वाडीवर राहणाऱ्या वयोवृद्ध चंद्रा नाईक यांच्या घरासह परिसरातील इतर घरांचे छप्पर वादळात उडाले आहे. चंद्रा नाईक यांच्या घरात त्या मतिमंद मुलगा दोघेच राहत आहेत. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने हातात पैसा नाही. त्यात चक्रीवादळाने डोक्यावरील छप्परही उडाल्याने पावसात भिजत राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

चिंचवली नारंगी भागातील आदिवासी वाडीवरही अशीच परिस्थिती आहे. एका वयोवृद्ध महिलेच्या घरावरील छप्पर उडाल्याने त्यांचा पूर्ण संसार पावसात भिजला आहे. सध्या या महिलेचे कुटूंब एका शाळेत राहत आहे. तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या दोन्ही वयोवृद्ध महिलांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे. गाठीला पैसा नसल्याने उडालेले छप्पर लावायचे कसे, हा प्रश्न या वयोवृद्ध महिलांना पडला आहे. जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाने त्वरित या महिलांना मदत करण्याची मागणी केली आहे.

दोन्ही आदिवासी वाडीवरील आदिवासी बांधवांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत धान्य पोहचविले जाणार असल्याची माहिती अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.