रायगड - रस्ते रुंदीकरण, बिल्डरांच्या विकास प्रकल्पांसाठी पनवेल शहरातील कितीतरी झाडांची बिनधोकपणे कत्तल सुरू आहे. पनवेल मधील शिवाजी चौकातील सौंदर्यीकरणाचा फटका हिरव्यागार झाडांना बसू लागला आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे रूप पालटण्याच्या नादात या भागातील झाडांची कत्तल करण्यात आली आहे. यामुळे पर्यावरणतज्ज्ञ आणि प्रेमी कमालीचे अस्वस्थ आहेत.
पनवेल महापालिकेच्या वतीने काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली होती. शिवाजी चौकात असलेल्या शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सभोवताली किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. यासाठी जवळपास 10 ते 15 हून अधिक झाडांवर कुऱ्हाड मारण्यात आली आहे. यामध्ये आंबा, अशोका आदी झाडांचा समावेश होता. संबंधित झाडे तोडण्यासाठी पालिकेने परवानगी दिली असली तरी सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. झाडे न तोडताही परिसराचे सुशोभीकरण करता आले नसते का, असा प्रश्न पर्यावरणप्रेमी विचारत आहेत.
हेही वाचा - 'अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात संविधानाची प्रस्तावना वाचली जावी'
तर ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश पर्यावरण विभागाकडून दिला जातो. मात्र, पनवेलमध्ये त्याचे तंतोतंत पालन होत नसल्याचे दिसून येत आहे.