रायगड - युनियनच्या मागे लागून तुम्ही स्वतःचे भविष्य धोक्यात टाकत आहात. आज नोकरी मिळणे कठीण झाले आहे. कमी पगार असेल तरी ती नोकरी टिकवून ठेवण्यात आपले भविष्य आहे, असा सल्ला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिला. तसेच कर्मचाऱ्यांना कानपिचक्या देखील दिल्या. अलिबाग आगाराच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.
अलिबाग आगराच्या बसस्थानकाचा भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी रावते यांनी एसटीचे ज्येष्ठ चालक अनंत थोरात यांना कुदळ मारण्याचा मान दिला. तसेच भूमिपूजन रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर अध्यक्षीय भाषणात दिवाकर रावते यांनी एसटी मध्ये झालेला बदल व कर्मचाऱ्यांसाठी केलेल्या योजनांचा पाढाच वाचला. यावेळी कर्मचाऱ्यांच्या असहकाराबाबत नाराजीही व्यक्त केली.
गेल्या ५ वर्षात एसटीमध्ये आमूलाग्र बदल केला आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच त्यांच्या मुलांसाठी अनेक योजना केल्या. मात्र, एकाही कर्मचाऱ्याने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, अशा शब्दात त्यांनी कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले. एसटीमध्ये 35 हजार कर्मचाऱ्यांची भरती केली. येत्या काही दिवसात 15 हजार नोकर भरती होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एसटी तसेच बाहेरील परिसर हा आपला असताना पिचकाऱ्या मारून अस्वच्छ करू नका, असे स्वच्छतेचे धडेही रावते यांनी कर्मचाऱ्यांना दिले. यावेळी माजी मंत्री मीनाक्षी पाटील, तालुकाप्रमुख राजा केणी, जिल्हा विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के तसेच एसटीचे चालक, वाहक आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.