रायगड - शनिवार-रविवार अशा लागोपाठ सुट्या आल्या, की पर्यटकांची पावले ही आपोआप रायगडकडे वळली जात होती. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून देशात कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने पर्यटन बंद झाले होते. शासनाने सहा महिन्यानंतर पुन्हा कोरोनाचे नियम पाळून हॉटेल, रिसॉर्ट, लॉजेस सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे रायगडमधील समुद्रकिनारी पुन्हा पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. अलिबाग समुद्रकिनारी तुरळक पर्यटक समुद्राचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. हॉटेल, रिसॉर्ट, लॉज व्यवसायिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.
देशात कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्याने २२ मार्चपासून लॉकडाऊन लागू झाले. याचा मोठा फटका पर्यटन क्षेत्रावर पडला. रायगड जिल्ह्यातही समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळे, धार्मिक स्थळे यावर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे रायगडातील पर्यटन सहा महिन्यांपासून ठप्प झाले होते. शासनाने हळूहळू लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर पुन्हा व्यवहार सुरू झाले आहेत. मात्र पर्यटनास अजून परवानगी मिळाली नव्हती. मात्र राज्य शासनाने हॉटेल, लॉजेस, रिसॉर्ट यांना नियमांचे पालन करून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तसेच नागरिकांना जिल्ह्याबाहेर जाण्यास ई-पासची परवानगी रद्द केल्याने आता पर्यटक हे रायगडात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
शनिवार-रविवार दोन दिवस सुट्टी आल्याने पुन्हा सहा महिन्यानंतर अलिबाग समुद्र किनारी पर्यटकांची तुरळक गर्दी झाली आहे. मुंबई, ठाणे, पुणे येथून आलेले पर्यटक समुद्राच्या पाण्यात मौजमजा करताना दिसू लागले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क लावून पर्यटक हे समुद्रकिनारी समुद्रात डुंबण्याचा आनंद घेत आहेत. तुरळक पर्यटक समुद्रकिनारी आले असले, तरी आगामी काळात पुन्हा एकदा जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.