रायगड - किल्ले रायगडावर जाताना हृदयविकाराचा झटका आल्याने एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. रमेश तुकाराम गुरव (वय 45) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्यांना तत्काळ महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रमेश गुरव हे मुंबईत विद्याविहार येथे राहणारे आहेत. दरवर्षी दिवाळीत रायगड किल्ल्यावर दिवे लावण्यासाठी पर्यटक येत असतात. अशाच एका पर्यटकाला जीवाला मुकावे लागले आहे.
रमेश गुरव मुंबई विद्याविहार येथून आपल्या मित्रांसोबत दरवर्षी दिवाळीत रायगड किल्ल्यावर दिवे लावण्यास येतात. किल्ल्याच्या पायऱ्यांवर पणत्या लाऊन दिवाळी साजरी करण्याची त्यांची परंपरा होती. गेली आठ ते दहा वर्षे सलग गुरव या ठिकाणी येत होते. मात्र यावर्षी त्यांच्यावर काळाने आघात केला आहे.
पणत्या लावताना आला हृदयविकाराचा झटका
रमेश गुरव हे पहाटे आपल्या आठ मित्रांसोबत रायगड किल्ल्यावर आले होते. किल्ल्याच्या पायऱ्यांवर पणत्या लावताना त्यांना छातीत दुखू लागले. त्यामुळे सोबत आलेल्या मित्रांनी त्यांना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती.