रायगड - रेवदंडा येथील जेएसडब्लू येथून रेहाकडे येणाऱ्या ट्रकचालकाने बेधुंद गाडी चालवत 8 लोकांना उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मद्यपी ट्रकचालकाच्या विरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातामध्ये शिक्षकाचा मृत्यू
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रेवदंडाकडून एम एच ०४ ई वाय ८५०१ या नंबरची ट्रक रेहाकडे जात होती. दरम्यान रस्त्यात साळव बिर्ला मंदिर येथे या चालकाने काजू विकणाऱ्या महिलांच्या टोपल्या उडविल्या, यात एक महिला आणि मुलगी जखमी झाली. दरम्यान ट्रक चालकाने तरी देखील वेग कमी केला नाही. त्याने साळाव व आमली परिसरात आणखी दोन व्यक्तींना उडवले. दरम्यान या ट्रकची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी हा ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र ट्रकचालक सुसाट वेगाने रोहाकडे जात होता. त्याने न्हावे फाट्यानजीक पुन्हा एका दाम्पत्याला आणि त्यांच्या मुलाला उडवले. या अपघातामध्ये शिक्षक ढेबे व त्यांचा मुलगा जागीच ठार झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या अपघातामध्ये शिक्षकाच्या गाडीचा चक्काचूर झाला आहे.
स्थानिक तरुणाने पकडले ट्रकचालकाला
दरम्यान तरी देखील हा ट्रकचालक थांबण्याचे नाव घेत नव्हता, त्याने चणेरा गावाजवळ आणखी एका व्यक्तीला उडवले या अपघातामध्ये त्याचा देखील जागीच मृत्यू झाला आहे. उदय वाकडे असे या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान त्यानंतर या मद्यपी ट्रकचालकाला चांडगाव नजीक एका स्थानिक युवकाने मोठ्या धाडसाने पकडले. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील कारवाई करण्यात येत आहे.
...तर झाला असता मोठा अनर्थ
कोकबनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार होती, या मिरवणुकीसाठी शिवभक्त जमा झाले होते. हा भरधाव ट्रक नेमका त्यांच्याच दिशेने येत होता, प्रसंगावधान राखून हे सर्व शिवभक्त वेळीच दूर झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.