उरण(रायगड) : उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन या डॉक्टर संघटनेने येथील शासकीय कोव्हिड केंद्रामधील रुग्णांसाठी मोफत सेवा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे उरण तालुक्यातील रुग्णांना अधिक चांगली सेवा मिळणार असून, मोठ्या शहरांमधील रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांची आकडेवारी कमी होणार आहे. या केंद्रामध्ये डॉक्टर आणि इतर कर्मचारी यांची संख्या कमी असल्याने, रुग्णसेवेत अडचणी येत असल्याने खाजगी डॉक्टर संघटनेने हा निर्णय घेतला आहे.
तीस डॉक्टर तीन शिफ्टमध्ये करणार काम
कोरोना महामारीचा वाढता प्रकोप पाहता, रुग्णांना पुरेशी सेवा मिळत नाही. तर काही रुग्णांना सेवेअभावी आपला प्राण गमवावा लागत आहे. शासकीय कोव्हिड हेल्थ केअर सेंटर फुल झाले असून, रुग्णांची बेड मिळवण्यासाठी फरफट होत आहे. उरण तालुक्यातील कोव्हिड केंद्रामध्ये अशीच काहीशी परिस्थिती असून, येथे अपुऱ्या मनुष्यबळामुळे रुग्णसेवेत अडचणी येत आहेत. याचा विचार करून उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन या खाजगी डॉक्टर संघटनेने उरणमधील कोव्हिड हेल्थ केअर केंद्रामध्ये रुगणांची मोफत सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ केअर सेंटरमधील रुगणांची दररोज योग्य देखभाल करून, येथे येणारा प्रत्येक रुग्ण येथेच पूर्ण बरा होऊन आपल्या घरी गेला पाहिजे असा या खाजगी डॉक्टरांचा प्रयत्न असणार आहे. यासाठी 30 डॉक्टर तीन शिफ्टमध्ये काम करणार असून, याकडे अनुभवी डॉक्टर लक्ष ठेवुन रोजचा रुग्णांचा आढावा घेणार आहेत.
वैद्यकीय अधीक्षकांनी निर्णयाचे केले स्वागत
अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे रुग्णसेवेमध्ये अडथळा येत होता. मात्र मेडिकल वेल्फेअर असोसिएशनच्या डॉक्टरांनी घेतलेल्या निर्णयामुळे येथील रुग्णांकडे पूर्णवेळ लक्ष देता येणार असून, येथील रुग्णांना मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जावे लागणार नाही. यामुळे खाजगी डॉक्टरांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रे यांनी केले आहे.