रायगड - येथील अलिबाग पेण रस्त्यावर पळी गावाजवळ मुसळधार पावसामुळे जुने मोठे झाड रस्त्यात पडल्याने पेणकडे जाणारी व अलिबागकडे येणारी वाहतूक बंद झाली आहे. त्यानंतर पर्यायी वाहतूक चरी-पेझारी मार्गे वळविण्यात आली. अलिबाग-पेण रस्त्यावरील ही आठवड्यातील दुसरी घटना आहे. रस्त्यावरुन झाड काढण्याचे काम स्थानिक ग्रामस्थ व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तर अनेक ठिकाणी झाडेही कोसळली होती. अशाच परिस्थितीत अलिबाग-पेण रस्त्यावर पळी गावाजवळ आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेले भले मोठे झाड रस्त्याच्या मध्ये पडले. त्यामुळे दोन्हीकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे.
पर्यायी व्यवस्था म्हणून पेणकडे जाणारी व अलिबागकडे येणारी वाहतूक कार्लेखिंड-जलपाडा ते पेझारी नाका अशी वळविण्यात आली आहे. त्यामुळे पर्यायी मार्ग असला तरी यामार्गावर वाहतूक वाढली आहे. झाड काढण्याचे काम सुरू असून अजून तीन चार तासानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्वरत होईल, असे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.