रायगड- दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिरातील सोन्याची मूर्ती चोरणारा मुख्य आरोपी सतीश उर्फ सत्या जैनू काळे याला नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. 2018 साली सुनावणीसाठी त्याला न्यायालयात आणले असता पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो पसार झाला होता. दोन वर्षानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
येवला वैजापूर सीमेवर असणारे बिल्वानी गावात एक इसम संशयितरित्या वावरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. सदर माहितीच्या आधारे सापळा रचून संशयित इसमास ताब्यात घेतले असता त्याच्या राहत्या घरातून कटावणी, टॉमी, पक्कड, स्क्रू ड्राइवर, तीन टॉर्च लाइट, एक चॉपर, एक चाकू असे घरफोडीचे साहित्य जमा करण्यात आले होते. आरोपी सतीश उर्फ सत्या जैनू काळे हा आपले शिवा जनार्धन काळे या नव्या नावाने राहत होता. नाशिक पोलिसांनी अधिक चौकशी केली असता काळे हा दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मूर्ती प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे समोर आले आहे.
न्यायालयाने दिली होती जन्मठेपीची शिक्षा
सन 2012 मध्ये दिवेआगार गणेश मंदिरामध्ये दरोडा टाकून दोन सुरक्षा रक्षकांचा खून करून गणेश मूर्ती चोरल्याचे प्रकरण गाजले होते. सदर प्रकरणातील मुख्य आरोपी सतीश उर्फ सत्या जैनू काळे याला अलिबाग येथील मोक्का न्यायालयाकडून जन्मठेपीची शिक्षा झाली होती. सन 2018 मध्ये आरोपीस सुनावणीसाठी नागपूर येथे घेऊन जात असताना तो भुसावळ रेल्वे स्टेशन येथून पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला होता. तेव्हापासून तो फरार होता.