रायगड - माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी आयएनएस विराट युद्धनौकेचा वापर कौटुंबिक पार्टीसाठी केला असल्याचा खळबळजनक आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेत केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील आरोपांचे माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी खंडन केले आहे. अलिबाग तालुक्यातील भायमळा येथे माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी आपल्या घरी पत्रकारांना माहिती दिली.
लोकसभा निवडणुकीसाठी देशात मतदान सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभरात जाहीर सभा सुरू आहेत. लोकसभेच्या निवडणुकीचा आता शेवटचा टप्पा सुरू झाला असून आरोप प्रतिरोपाच्या फैरी एकमेकांवर केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर एका जाहीर सभेत विराट आयएनएस या युद्धनौकेचा कौटुंबिक सहलीसाठी वापर केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या आरोपानंतर देशभरात खळबळ माजली आहे.
माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या आरोपांचे खंडन केले असून त्यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. लक्षद्वीप बेटावर राजीव गांधी हे बेट विकासाच्या दृष्टीने पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्याच्यासोबत राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया गांधी उपस्थित होते. इतर कोणीही त्यांच्यासोबत नव्हते, असे माजी नौदल प्रमुख एल. रामदास यांनी सांगितले.
त्याचबरोबर सेनेला राजकारणात ओढू नये, असे निवडणूक आयोगाला कळविले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचे एल. रामदास यांनी यावेळी सांगितले.