पनवेल - राज्यात आजपासून दहावीची परीक्षा सुरू झाली आहे. पनवेल शहरातील सर्व केंद्रावर आजचा पहिला पेपर शांततापूर्ण वातावरणात पार पडला. कुठेही कॉपीचा प्रकार न झाल्याने माध्यमिक शिक्षक विभागाने समाधान व्यक्त केले आहे. दहावीच्या परीक्षेला आज मराठी विषयाच्या पेपरने सुरुवात झाली. परीक्षेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांसोबत त्यांचे मित्र, पालक यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थिती लावली. पेपरसाठी विद्यार्थ्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. बोर्डाची पहिलीच परीक्षा असल्याने बारावीच्या तुलनेत दहावीच्या विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पालक परीक्षा केंद्रावर आले होते.
कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी अनेक भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. सर्व ठिकाणी पहिला पेपर व्यवस्थित पार पडला. मराठीच्या पेपरला शहरात कुठेही कॉपीचा प्रकार झाला नाही. शहरात कॉपीचा प्रकार न झाल्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. ३ तासांचा पहिला पेपर संपवून बाहेर आल्यानंतर "अरेच्च्या, इतकं काही कठीण नाही", असे विद्यार्थी सांगताना दिसून आले. पेपर संपल्यानंतर सकाळपासून चिंताग्रस्त असलेले चेहरे 'ऑल इज वेल' म्हणत घराकडे परतताना दिसून आले. आता विद्यार्थी दुसर्या पेपरच्या तयारीला लागले आहेत.