रायगड - अलिबाग शहरात असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राची आज (7 मे) प्रांताधिकारी प्रशांत ढगे, तहसीलदार सचिन शेजाळ आणि पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे यांनी पाहणी केली. येथील परिस्थितीचा आढावा घेतला. 'लसीकरण केंद्रावर सुरक्षित अंतर ठेवून उत्तमपणे लसीकरण सुरू आहे. रजिस्ट्रेशन झालेलेच नागरिक लसीकरण केंद्रावर येत आहेत. त्यामुळे अनावश्यक होणारी गर्दी टळत आहे', अशी माहिती अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली आहे.
लसीकरण केंद्राच्या 200 मीटरमध्ये संचारबंदी
जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम जानेवारीपासून सुरू झाली आहे. अलिबाग शहरात नगरपरिषदेच्या प्राथमिक मराठी शाळेत आणि आरसीएफ कॉलनीत अशा 2 ठिकाणी, तर ग्रामीण भागात 5 ठिकाणी 18 ते 44 आणि 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. मात्र, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने कोरोना नियमांचे उल्लंघन होत होते. तर आरोग्य यंत्रणे व्यतिरिक्त इतर राजकीय व्यक्ती यांचा वावर वाढला होता. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गोंधळ वाढला होता. ही बाब जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरण केंद्राच्या 200 मीटर परिसरात संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. त्यामुळे फक्त रजिस्ट्रेशन केलेल्याच नागरिकांना लसीकरण केंद्रात प्रवेश दिला जात आहे.
'नियमांचे पालन करून लसीकरण'
'आज अलिबाग शहरातील 2 लसीकरण केंद्राची पाहणी आम्ही केली आहे. या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे पालन करून लसीकरण सुरू आहे. ज्यांचे रजिस्ट्रेशन झाले आहे तेच केंद्रावर येत असल्याने पूर्वीप्रमाणे होणारी गर्दी आता दिसत नाही. लसीचा साठा आणखी उपलब्ध झाल्यास केंद्रे वाढविली जातील', असे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - मुंबई पालिकेच्या ऑक्सिजनबाबत 'या' उपाययोजनांची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल
हेही वाचा - आत्महत्येतही महाराष्ट्र अव्वल! 2019 मध्ये 18,916 जणांनी संपविले जीवन!