रायगड- तांबडी अत्याचार प्रकरणातील खटला हा जलद गती न्यायालयामध्ये चालविण्यात येणार आहे. या खटल्यात सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. अत्याचार आणि हत्या प्रकरणात लवकरच आरोपपत्र न्यायालयात दाखल केले जाणार असून आरोपीला कठोर शिक्षा मिळण्यासाठी आमचा प्रयत्न राहील, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
रोहा तांबडी येथे पीडित मुलीच्या कुटुंबाची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर त्यांची रोहा ज्येष्ठ नागरिक सभागृहात पत्रकार परिषद झाली. यावेळी देशमुख यांनी तांबडी प्रकरण, ई पास, सुशांतसिंह प्रकरण आणि काँग्रेसबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
रोहा तांबडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी १२ तासांत आरोपींना अटक केली. यावर, प्रकरणाचा खटला जलद गती न्यायालयात चालविणार आहे. या खटल्यात अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. मराठा मोर्चा आणि शिवसंग्राम नेते आमदार विनायक मेटे यांनाही आपण भेटलो असून त्यांनी केलेल्या मागणीनुसार निर्णय घेतल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.
हेही वाचा- पेणमधील हेटवणे धरणाचे 6 दरवाजे उघडले, नदी किनारच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा