रायगड- मुंबईपासून अंदाजे ५० किमी आणि पनवेलहून अवघ्या ८ किमी अंतरावर असलेल्या ‘तळोजा एमआयडीसी’ क्षेत्राची झपाट्याने वाढ होते आहे. मात्र, हा परिसर वेगवेगळ्या समस्यांच्या जाळ्यात अडकला आहे. प्रदूषण, गटरांची दुरावस्था व आवश्यक सोयी-सुविधांचा अभाव असल्याने परिसरातील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ‘उद्यमात सकल समृद्धी’ असे बिरूद मिरविणारी एमआयडीसी गावकऱ्यांचे प्रश्न केव्हा दूर करणार, हा प्रश्न आहे.
जवळपास ८६३ हेक्टरवर पसरलेल्या या एमआयडीसी क्षेत्रात असंख्य लघू, मध्यम तसेच मोठ्या इंडस्ट्रीजचे मॅन्युफॅक्च्युरिंग प्लांट आणि कार्यालये आहेत. पनवेल-कल्याण मार्गावरून सहज पोहोचणे शक्य असल्याने येथे विकासाचा वेग वाढला आहे. मात्र, जवळपास ६० हजार कोटी इतकी वार्षिक उलाढाल असलेला हा परिसर सध्या वेगवेगळ्या समस्यांच्या विळख्यात अडकला आहे. इथल्या ग्रामस्थांच्या समस्या वर्षानुवर्षे दुर्लक्षितच आहेत. तळोजा एमआयडीसी क्षेत्रात पेणधर, तोंडरे, घोट, खेरणे, पडघा, नावडा, देवीचा पाडा ही गावे येतात. येथील गावकऱ्यांच्या जमिनींचे व्यवहार, तसेच पाणीप्रश्न मार्गी लागले आहेत. मात्र, ‘प्रदूषण’ हा या सर्व ग्रामपंचायतींसमोरील मुख्य प्रश्न आहे.
सांडपाण्यामुळे नद्यांना नाल्याचे स्वरुप
गावा सभोवताली असलेल्या अनेक केमिकल कंपन्यांचा दर्प तसेच, सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी गावाच्या कडेला असलेल्या नाल्यात सांडपाणी सोडले जाते. यामुळे येथील मासे मृत पावल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. केमिकलचे ट्रक साफ करताना उडणाऱ्या वायुकणांमुळेही श्वसनाचे त्रास होत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे. घोट गावाच्या बाजूनेच जाणाऱ्या नदीतही सांडपाणी सोडले जाते. तळोजातून वाहणारी कासाडी आणि मलंग ही नदी आहे की नाला, असा प्रश्न विचारण्याची गरज निर्माण झाली आहे.
पायाभूत सुविधांची वानवा
तळोजा एमआयडीसी क्षेत्रात पायाभूत सुविधांची वानवा असल्यामुळे या औद्योगिक क्षेत्राचा विकास खुंटल्याचा आरोप इथले उद्योजक करत आहेत. अनेक कंपन्यांनी तर आपला गाशा गुंडाळून कंपनीला टाळे ठोकण्यातच धन्यता मानली आहे. एवढ्या मोठ्या एमआयडीसीमध्ये एक रुग्णालयदेखील उभारण्यात आलेले नाही. औद्योगिक वसाहतीत अद्याप राखीव असलेल्या पार्कींगसाठी स्वतंत्र भूखंड ठेवण्यात आले नसल्याने संपूर्ण औद्योगिक वसाहतीला अवजड वाहनांनी वेढा घातल्याचे दिसून येते.
विशेष म्हणजे, ज्वलनशील पदार्थांनी भरलेले टँकरदेखील रस्त्यांवर सर्रास उभे असतात. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला डेब्रिज टाकलेले आहे. औद्योगिक वसाहतीमधील सांडपाण्यावर प्रक्रिया केल्या जाणाऱ्या सीईटीपी प्रकल्पालगतच्या रस्त्याच्या कडेला डेब्रिजचे मोठे-मोठे ढिगारे पडले आहे. औद्योगिक वसाहतीत फेरफटका मारल्यास अनेक ठिकाणी उघडी गटारे, तसेच अर्धवट ड्रेनेजची कामे सहज नजरेत पडतात. ही कामे अग्रक्रमाने मार्गी लावणे गरजेचे आहे. एकही अधिकृत वाहनतळ नसल्याने संपूर्ण औद्योगिक वसाहतीमधील रस्ते अवजड वाहनांच्या अनधिकृत पार्कींगने गजबजलेले असतात.
प्रदूषणाचा विषय हरित लवादाकडे
तळोजा औद्योगिक वसाहतीत प्रदूषणासंदर्भात शेकाप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी हरित लावादाकडे धाव घेतली. नगरसेवक म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार दाखल केल्यापासून कोट्यवधी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. दंड न भरल्यास अधिकाऱ्यांच्या पगारातून दंड घेण्यात यावा, एवढी टोकाची भूमिका तळोजातील प्रदूषणाबाबत म्हात्रे यांनी घेतली होती. म्हात्रे यांनी खालपासून वरपर्यंत सर्व यंत्रणांना प्रतिवादी केले आहे. एवढेच नव्हे तर नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेलाही सोडले नाही. त्यामुळे, तळोजा एमआयडीसीची समस्यांच्या जाळ्यातून सुटका होईल, अशी अपेक्षा परिसरातील गावकऱ्यांना आहे.
हेही वाचा- पनवेलमध्ये शिक्षिकेचा उपायुक्तांविरोधात महापालिकेवर मोर्चा