खालापूर(रायगड) - कर्जत तालुक्यातील सोनल शिवाजी कोकणे या विद्यार्थिनीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला (Student dies in train accident) आहे. जांमरुंग गावातील ही विद्यार्थिनी सध्या तिच्या मामाच्या गावी जिते येथे राहायला होती. 6 एप्रिल रोजी ती कॉलेजवरुन परतत असताना रेल्वे मार्गाने जात असताना भरधाव वेगाने जाणार्या लांब पल्ल्याच्या गाडीने तिला उडवले. या अपघातात तिचा मृत्यू झाला आहे.
कला शाखेच्या पहिल्या वर्षात शिकत असलेली सोनल कोकणे ही तरुणी तालुक्याचे शेवटचे गाव असलेल्या जांमरुंग गावी राहत असल्याने तिला महाविद्यालयीन शिक्षण घेणे परवडणारे नव्हते. त्यामुळे जांमरुंग येथून ती आपल्या मामाकडे नेरळ जवळील जिते गावी राहत होती.
रेल्वेच्या धडकेने शरीराचे झाले तुकडे - कर्जत शहरातील अभिनव प्रशालेच्या उच्च महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिक्षण घेणारी सोनल कर्जत येथून जिते येथे घरी जाण्यासाठी नेरळ रेल्वे स्थानकात सकाळी 11 वाजून 25 मिनिटांनी उतरली. रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर, रिक्षा पकडण्यासाठी रेल्वे मार्गाने पाडा गेट येथे नेहमीप्रमाणे जाण्याच्या रस्त्याने सोनल चालत निघाली. मात्र, त्याच सुमारास कर्जत येथून मुंबईकडे जाणाऱ्या 7032 हैद्राबाद एक्सप्रेसने तिला धडक दिली. या अपघातात सोनलचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भयानक होता की, तिच्या शरीराचे तुकडे झाले होते. नेरळ रेल्वे स्थानक तेथून 100 मीटर अंतरावर असल्याने अपघाताची माहिती मिळताच, पोलीस तत्काळ घटनास्थळी स्ट्रेचर घेऊन पोहचले. मात्र समोरील दृश्य हेलावून टाकणारे होते.